मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

वर्षाऋतुची राणी

वर्षाऋतुची राणी

गर्जेल तो पडेल काय खोटे ठरवत
ग्रीष्मऋतु तो आला गरजत
वर्षाराणीला धरून अंगाशी घट्ट
म्हणे मी पुरवीन तुझे सर्व हट्ट
ऐकून वर्षाराणी झाली लाजून चूर
अंगावाटे लागला घामाचा पूर
पुराच्या वर्षावात सर्व ओलीचिंब झाली
भिजल्या इमारती, झोपड्या अन रस्त्यावरी तळी
तळ्यांमध्ये लहानथोर स्वच्छंदे बागडती
येणाऱ्या जाणाऱ्यांवर चिखल उडवती
पाहून हे वर्षाराणीला अति गंमत वाटली
अलगद सोडवून मिठी, जोरात हसू लागली
हसता हसता डोळ्यातूनही टपके आता पाणी
आला पाऊस, आला पाऊस झाला हर्ष जनी
पाहून हे सर्व ग्रीष्मऋतु विचारात गुंग
काय माझा उपयोग देवा मला सांग
देव म्हणे बाळा ना उगा तुझा जन्म
मारू देत कितीही लोक तुझ्या नावे बोंब
तुझा ताप तिला आहे हीच खरी मेख
ती तापल्याविना ना फुटे एकही कोंब
त्याचसाठी तुझ्या हाती सोपविली वर्षाराणी
चिंब भिजवाया त्या धरतीला कणोकणी
ऐकून सर्व हे ग्रीष्मऋतु ओशाळला मनी
जाई घेऊन राणीला वर्षाऋतुच्या महाली
वर्षाऋतुच्या महाली, वर्षाऋतुच्या महाली

(२ जून, २०११)